दृष्टिबाधित कवींच्या प्रतिभेला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ; नागपुरात २२ नोव्हेंबरला ‘काव्यदृष्टी २०२६’!

दृष्टिबाधित कवींच्या साहित्यिक प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नागपुरात एका विशेष साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘काव्यदृष्टी २०२६’ असे या राष्ट्रीय कवी संमेलनाचे नाव असून, येत्या २२ नोव्हेंबर रोजी नागपुरात हे संमेलन पार पडणार आहे. देशाच्या विविध राज्यांतील दृष्टिबाधित कवी या संमेलनात सहभागी होऊन आपल्या कवितांच्या माध्यमातून साहित्यिक प्रतिभेचा आविष्कार सादर करणार आहेत.

लायन्स क्लब नागपूर क्लासिक, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर इंटिग्रेशन ऑफ द ब्लाइंड (NOIB), समृद्ध भव फाउंडेशन आणि लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४-H1 यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दृष्टिबाधित कवींच्या भारतातील पहिल्या राष्ट्रीय कवी संमेलनाच्या स्वरूपात या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
विशेष म्हणजे, या संमेलनातून जमा होणारा निधी नागपुरात दृष्टिबाधित व्यक्तींसाठी प्रशिक्षण आणि सक्षमीकरण केंद्र उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून दृष्टिबाधित व्यक्तींना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता, सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर, रोजगाराच्या संधी आणि स्वावलंबनासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
साहित्याच्या माध्यमातून प्रतिभेला व्यासपीठ आणि सामाजिक उपक्रमातून स्वावलंबनाला बळ देणारा ‘काव्यदृष्टी २०२६’ हा उपक्रम नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रूपा पंडित, ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज, नागपूर.



