नागपुरात पहाटे भीषण अपघात! बॅरिकेड तोडून कार थेट नाल्यात कोसळली

अंबाझरीतील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याजवळ दुर्घटना; अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरात आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. अंबाझरी परिसरातील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याजवळ भरधाव कार रस्त्यावरील बॅरिकेड तोडून थेट नाल्यात कोसळली. पहाटे सुमारे ४ वाजताच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एक कार अंबाझरी परिसरातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला लावलेले बॅरिकेड तोडून थेट नाल्यात जाऊन कोसळली. अपघाताची तीव्रता लक्षात घेता वाहनाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृत व्यक्तीबाबत तसेच वाहनातील अन्य प्रवाशांबाबत अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला की यामागे अन्य काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून अपघातस्थळाची पाहणी करून नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.



