धारणी तालुक्यात नद्यांचे पाणी खुलेआम वाया!

गडगा, सिपना आणि तापी नदीपात्रातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर; उन्हाळ्यापूर्वीच ग्रामीण भागात पाणीटंचाईची चिंता, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
संदीप राऊत | धारणी
धारणी तालुक्यातून वाहणाऱ्या गडगा, सिपना आणि तापी या प्रमुख नद्यांच्या पाण्याचा सध्या मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे ग्रामीण भागातील नागरिकांना भविष्यातील पाणीटंचाईची चिंता सतावत असताना दुसरीकडे नदीपात्रात अडवून ठेवलेले पाणी योग्य नियोजनाअभावी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरून धारणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

धारणी तालुक्यातील अनेक गावांजवळून गडगा, सिपना आणि तापी या नद्या वाहतात. काही गावांमध्ये नदीपात्रात पाणी अडविण्याची सुविधा उपलब्ध असल्याने संबंधित ठिकाणी पाणी अडवून ठेवण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांना आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी अडविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र, ज्या उद्देशाने नदीपात्रात पाणी अडविण्यात आले, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र गडगा नदीपात्रात पाहायला मिळत असल्याची बाब समोर येत आहे. नदीपात्रातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून, काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीसाठा टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून मानवी जीवनाचा आणि पशुधनाच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा आधार आहे. विशेषतः मेळघाटातील ग्रामीण आणि दुर्गम भागात उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करते. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि काटकसरीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. आज नदीपात्रात उपलब्ध असलेले पाणी अनियंत्रितपणे वापरले गेले, तर येत्या उन्हाळ्यात नागरिकांसह पशुधनालाही पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते.
प्रशासन झोपेत आहे काय? नागरिकांचा सवाल!
नदीपात्रात पाणी अडविण्यामागे शासनाचा उद्देश पाणीटंचाईवर मात करणे हा असताना त्याच पाण्याचा अपव्यय होत असेल, तर संबंधित यंत्रणा याकडे लक्ष का देत नाही, असा सवाल धारणी तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नदीपात्रातील पाण्याचा वापर कोणत्या कारणासाठी आणि किती प्रमाणात होत आहे, यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडगा, सिपना आणि तापी नदीपात्रांची पाहणी करून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच अडवून ठेवलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून उन्हाळ्यापर्यंत पाणीसाठा टिकवून ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कारण पाणी असेल तरच जीवन आहे… आज पाण्याचा अपव्यय थांबवला नाही, तर उद्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ शकते!



