AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

कोट्यवधींचा खर्च, मात्र स्वच्छतेचा बोजवारा!

मोरबाग-विलासनगर प्रभागात कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर; १० कचरा गाड्यांऐवजी केवळ ४ गाड्यांवर संपूर्ण प्रभागाचा भार, नगरसेवक दीपक साहू सम्राट यांचा पुढाकार

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेकडून शहराच्या स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे मोरबाग-विलासनगर प्रभागात मात्र स्वच्छता व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. पूर्वी या प्रभागात कचरा संकलनासाठी १० गाड्या कार्यरत होत्या. मात्र, आता गाड्यांची संख्या घटून केवळ ४ वर आल्याने संपूर्ण प्रभागातील कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एवढ्या मोठ्या परिसरासाठी अवघ्या चार गाड्या उपलब्ध असल्याने घराघरातील कचरा, नाल्यांमधील कचरा आणि रस्त्यांवरील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोरबाग-विलासनगर प्रभागांतर्गत इतवारा बाजार, चित्रा चौक, मटन मार्केट, भाजी मार्केट, फ्रूट मार्केट, फूल मार्केट यांसारख्या मोठ्या बाजारपेठांचा समावेश आहे. याशिवाय मोरबाग, विलासनगर, कपिलवस्तू नगर, अशोक नगर, गौतम नगर, म्हाडा कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, रमाबाई आंबेडकर नगर, रतनगंज, चेतनदास परिसर, गौळीपुरा, कडवी बाजार, जाफर जिन, बॉम्बे फेल, बच्छराज प्लॉट, चित्रा चौक आणि झाडपीपुरा यांसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरांचाही या प्रभागात समावेश होतो.

या संपूर्ण परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. बाजारपेठांमधील व्यावसायिक कचरा, घरगुती कचरा तसेच नाल्यांमधील घाण यांचे संकलन करण्यासाठी पुरेशा वाहनांची आवश्यकता आहे. मात्र, केवळ चार गाड्यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या क्षेत्राची स्वच्छता करणे अशक्यप्राय ठरत आहे. परिणामी नागरिकांना अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, स्वच्छता व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मोरबाग प्रभागाचे नगरसेवक दीपक साहू सम्राट यांनी या समस्येबाबत संबंधित कंत्राटी कंपनी तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. प्रभागातील कचरा संकलनासाठी पूर्वीप्रमाणे पुरेशा गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, वारंवार माहिती देऊनही ना समाधानकारक प्रतिसाद मिळाला, ना कचरा गाड्यांची संख्या वाढविण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेर नगरसेवकच उतरले मैदानात!

प्रभागातील नागरिकांची गैरसोय आणि वाढती अस्वच्छता लक्षात घेता नगरसेवक दीपक साहू सम्राट यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोन तासांचा विशेष उपक्रम राबवून प्रभागात कचरा संकलनाचे काम सुरू करवून घेतले. महानगरपालिका आणि संबंधित कंपनीकडून अपेक्षित व्यवस्था उपलब्ध होत नसताना लोकप्रतिनिधींना स्वतः पुढाकार घेऊन कचरा संकलनाची व्यवस्था करावी लागत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

एकीकडे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे मोठ्या लोकवस्तीच्या प्रभागात कचरा संकलनासाठी आवश्यक वाहनांची संख्या कमी होत आहे. स्वच्छतेसाठी कोट्यवधींचा खर्च होत असताना प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर या खर्चाचा उपयोग नेमका कुठे होत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

आता तरी महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटी कंपनीने या प्रभागातील कचरा संकलनासाठी पुरेशा गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा स्वच्छतेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रश्न एकच… कोट्यवधींचा खर्च होऊनही स्वच्छता ठप्प असेल, तर जबाबदार कोण?

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button