वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या तरुणीशी गैरवर्तन; ४५ वर्षीय आरोपी ताब्यात

दारूच्या नशेत तरुणीला मिठी मारून गैरवर्तन केल्याचा आरोप; यापूर्वीही अशाच प्रकारचे कृत्य केल्याची तक्रार
नागपूर : शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ वर्षीय तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पेढे घेऊन गेलेल्या तरुणीशी दारूच्या नशेत असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम पात्रा असे आरोपीचे नाव आहे. २५ वर्षीय तरुणी आरोपीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पेढे घेऊन गेली होती. यावेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. त्याने तरुणीला मिठी मारून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे.
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे, आरोपीने यापूर्वीही दोन ते तीन वेळा अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
तरुणीच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७८, ७९ आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



