सोशल मीडियावर लाईक्स अन् व्ह्यूजचा नाद जीवावर बेतण्याची शक्यता!

नागपुरात धावत्या मोपेडवरून रॉकेट फोडण्याचा धक्कादायक प्रकार; दोन आरोपींसह दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या हव्यासापोटी तरुणाईकडून जीवघेणे स्टंट करण्याचे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला असून, दिवाळीदरम्यान काही तरुणांनी भरधाव धावणाऱ्या मोपेडवरून रस्त्यावरच रॉकेट फोडल्याचा प्रकार घडला. केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेल्या या बेजबाबदार कृत्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांसह पादचाऱ्यांचाही जीव धोक्यात आला होता.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे धोकादायक स्टंट करून नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी दिले.
त्यानुसार इंदोरा वाहतूक झोनच्या पथकाने व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही मोपेडची ओळख पटवून पोलिसांनी संबंधित तरुणांचा शोध घेतला. या कारवाईत दोन प्रौढ आरोपींसह दोन अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावर काही क्षणांची प्रसिद्धी आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादात या तरुणांनी सार्वजनिक रस्त्यावर इतरांच्या जीविताला धोका निर्माण केला. सणासुदीच्या काळात रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ असताना अशा प्रकारचे कृत्य गंभीर अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकते.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा स्वतःचा आणि इतरांचा जीव महत्त्वाचा असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.



