citynewsFestival Newslatestnewss breakingnewsMaharashtraNagpurramtek

रामटेकमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या भव्य शोभायात्रेची जय्यत तयारी; शहर सज्ज!

१०० आकर्षक झांक्यांचा सहभाग; पाच लाखांहून अधिक रुपयांची रोख बक्षिसे, विदर्भासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील भाविकांची राहणार उपस्थिती

रामटेक | प्रतिनिधी : अजय मेहरकुळे, सिटी न्यूज

रामटेक : नागपूर जिल्ह्यातील रामटेक नगरीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भारतीय जनसेवा मंडळाच्या भव्य शोभायात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या या शोभायात्रेसाठी संपूर्ण रामटेक शहर सज्ज होत असून, यंदा सुमारे १०० आकर्षक झांक्यांचा सहभाग हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे, विविध झांक्यांसाठी पाच लाख रुपयांहून अधिक रकमेची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

स्वर्गीय संत गोपालदास महाराज यांच्या प्रेरणेतून तब्बल ४५ वर्षांपूर्वी या शोभायात्रेची परंपरा सुरू झाली. गेल्या साडेचार दशकांपासून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारी ही शोभायात्रा आता रामटेकच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण बनली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक, नागरिक आणि विविध सामाजिक मंडळे सहभागी होणार आहेत.

यंदाच्या शोभायात्रेत ट्रक झांकी, ट्रॅक्टर झांकी, पायदळ झांकी तसेच विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील देखावे सादर केले जाणार आहेत. आकर्षक सजावट, कलात्मक मांडणी आणि वैविध्यपूर्ण विषयांच्या माध्यमातून या झांक्यांमधून विविध संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या स्पर्धात्मक झांक्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रोख पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या भव्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केवळ विदर्भातूनच नव्हे, तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधूनही नागरिक मोठ्या संख्येने रामटेकमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने रामटेकमध्ये धार्मिक उत्साहासोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडणार आहे.

शोभायात्रा यशस्वी आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, महासचिव तथा माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, राहुल कोठेकर यांच्यासह १३ सदस्यीय कार्यकारिणी आणि मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

बाईट : चंद्रपाल चौकसे – अध्यक्ष, भारतीय जनसेवा मंडळ

४५ वर्षांची परंपरा, शेकडो कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि आकर्षक झांक्यांची रेलचेल यामुळे यंदाची कार्तिक पौर्णिमेची शोभायात्रा विशेष ठरणार आहे. आता २३ नोव्हेंबरच्या भव्य सोहळ्याकडे रामटेकसह संपूर्ण विदर्भातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कॅमेरामनसह, अजय मेहरकुळे, रामटेक | सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button