citynewsFestival News

फटाके फोडताना सावधान! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी

डोळ्यांच्या दुखापती, आगीच्या दुर्घटना आणि प्रदूषण रोखण्यासाठी खबरदारीचे आवाहन; लहान मुलांवर मोठ्यांची देखरेख अनिवार्य

नवी दिल्ली : सणासुदीचा काळ म्हटला की फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाई आलीच. मात्र, आनंदाच्या या उत्सवात फटाक्यांच्या निष्काळजी वापरामुळे होणारे अपघात, डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती आणि वाढते वायुप्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फटाक्यांच्या सुरक्षित वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फटाके उत्पादकांसाठी कडक सुरक्षा मानके निश्चित करण्यात आली आहेत. फटाक्यांमध्ये बेरियमसारख्या घातक रसायनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यासाठी अधिकृत ग्रीन फटाक्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. ग्रीन फटाके खरेदी करताना त्यांच्या पॅकिंगवरील क्यूआर कोड तपासून अधिकृततेची खात्री करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

फटाके फोडताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फटाके नेहमी मोकळ्या आणि सुरक्षित जागेतच फोडावेत. घरांच्या जवळ, वाहनांच्या आसपास किंवा ज्वलनशील पदार्थ असलेल्या ठिकाणी आतषबाजी टाळावी. लहान मुले फटाके फोडत असताना पालक किंवा मोठ्या व्यक्तींची थेट देखरेख असणे गरजेचे आहे. तसेच कार्बाइड किंवा धातूच्या पाईपपासून तयार केलेल्या देशी बंदुकीसारख्या धोकादायक साधनांचा वापर पूर्णपणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अपघात झाल्यास काय काळजी घ्यावी?

फटाक्यांमुळे भाजल्यास प्रभावित भागावर तातडीने थंड वाहते पाणी सोडावे. भाजलेल्या ठिकाणी बर्फ, टूथपेस्ट, तेल किंवा इतर घरगुती पदार्थ लावू नयेत. डोळ्यांना फटाक्यांमुळे इजा झाल्यास डोळे चोळू नयेत किंवा स्वतःहून कोणताही उपचार करू नये. अशा परिस्थितीत तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी.

सणाचा आनंद साजरा करताना स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांचा मर्यादित आणि जबाबदारीने वापर, लहान मुलांवर देखरेख आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करून सुरक्षित व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button