नागपुरात सेग्रीगेशन प्लांटमध्ये भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून २८ वर्षीय मजुराचा मृत्यू

बिडगाव रोडवरील कंपनीत कचरा साफ करताना पाय घसरून ट्रॉमल मशीनमध्ये अडकला; रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित
नागपूर : वाठोडा परिसरातील बिडगाव रोडवरील SUSBED कंपनीत काम करताना ट्रॉमल मशीनमध्ये अडकून एका २८ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सलमान अयुब खान (वय २८, रा. अंतुजी नगर, भांडेवाडी) असे मृत मजुराचे नाव आहे. आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सेग्रीगेशन प्लांटमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सलमान खान हा अक्षय विलकर याच्यासोबत सेग्रीगेशन प्लांटमधील ट्रॉमल मशीनवरील कचरा साफ करण्यासाठी वर चढला होता. कचरा साफ करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो मशीनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर कंपनीच्या माध्यमातून नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी पारडी येथील भवानी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने मृतदेह पुन्हा वाठोडा येथे आणण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी मृतकाचे वडील अयुब खान यांची तक्रार नोंदवून आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. घटनास्थळी मृतकाचे २० ते २५ नातेवाईक उपस्थित असून, प्राथमिक माहितीनुसार त्यांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. परिसरात तसेच कंपनीत शांतता असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.
या अपघातामुळे औद्योगिक आणि कचरा प्रक्रिया केंद्रांमधील यंत्रांवर काम करताना घ्यावयाच्या सुरक्षा उपायांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



