ट्रॅव्हल्सच्या धडकेत जखमी व्हीएनआयटीच्या माजी टॉपरचा उपचारादरम्यान मृत्यू

बजाजनगर परिसरात सायकलस्वाराला खासगी बसची धडक; अपघातानंतर चालक पसार झाल्याचा आरोप
नागपूर : खासगी ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्हीएनआयटीच्या माजी टॉपर विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वेश करोलीकर (वय ३४) असे मृत अभियंत्याचे नाव असून, या घटनेमुळे नागपुरात हळहळ व्यक्त होत आहे.
२६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बजाजनगर परिसरातील आरटीपीएस रोडवर असली कॉफी कॅफेजवळ हा अपघात घडला. सर्वेश करोलीकर सायकलने जात असताना मध्यप्रदेश नोंदणी क्रमांक असलेल्या संजय ट्रॅव्हल्सच्या बसने (एमपी २० झेडव्ही ०६५१) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना सुरुवातीला स्वास्थ्यंम रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी विवेकानंद रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १०६ जोडले आहे.
संजय ट्रॅव्हल्सच्या बसशी संबंधित पूर्वीचे अपघातही चर्चेत
संजय ट्रॅव्हल्सच्या बसशी संबंधित अपघातांची ही पहिलीच घटना नसल्याचे समोर आले आहे. ९ सप्टेंबर रोजी नागपुरातील वैष्णोदेवी चौकात याच कंपनीच्या बसने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात एक महिला आणि तिची चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती.
तसेच, ४ जून रोजी समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या संजय ट्रॅव्हल्सच्या बसची टिप्परला धडक झाली होती. या दुर्घटनेत १९ प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते.
व्हीएनआयटीमधील अभियांत्रिकीचा माजी टॉपर असलेल्या सर्वेश करोलीकर यांच्या मृत्यूने एका होतकरू अभियंत्याचा दुर्दैवी अंत झाला असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



