citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापाराचा आरोप; एका पीडित महिलेची सुटका

सामाजिक सुरक्षा विभाग आणि एएचटीयूची गणेश नगर परिसरात कारवाई; स्पा मालकीण व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

नागपूर : स्पा सेंटरच्या नावाखाली आर्थिक फायद्यासाठी महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास भाग पाडल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. सामाजिक सुरक्षा विभाग आणि मानवी तस्करीविरोधी पथकाने (AHTU) कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर परिसरातील एसएम स्पा सेंटरवर छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. या कारवाईत स्पा मालकीण आणि व्यवस्थापकाला आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नगर येथील गणेश वंदना अपार्टमेंटमधील एसएम स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार दोन पंच आणि बोगस ग्राहकाच्या मदतीने २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी कारवाई करण्यात आली. या वेळी एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी स्पा मालकीण शाबा परवीन मुनवर शेख (वय ३६, रा. महल, नागपूर) आणि व्यवस्थापक शेख मोहसीन ऊर्फ मुन्ना शेख (वय २८, रा. नंदनवन, नागपूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिलेला कमी वेळेत अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून ग्राहक पुरविण्यात येत होते आणि तिला देहव्यापार करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे.

छाप्यादरम्यान ४२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा १९५६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button