यवतमाळमध्ये एकाच वेळी ३ हजार किलो बुढीचा चिवडा!

शेफ विष्णू मनोहर यांचा अनोखा उपक्रम; विश्वविक्रमाची नोंद होण्याची शक्यता, पहाटेपासून चिवड्यासाठी गर्दी
यवतमाळ | दुर्गेश कान्हु
यवतमाळच्या प्रसिद्ध बुढीच्या चिवड्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी एकाच वेळी तब्बल ३ हजार किलो बुढीचा चिवडा तयार करण्यात आला. शेफ विष्णू मनोहर आणि शेफ प्राजक्ता शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या चिवड्याचा आस्वाद घेण्यासाठी पहाटेपासूनच यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली होती.
हा चिवडा तयार करण्यासाठी १५ हजार लिटर आणि ५ हजार लिटर क्षमतेच्या दोन मोठ्या कढईंचा वापर करण्यात आला. रात्रभर प्रक्रिया करून तब्बल ३ हजार किलो चिवडा तयार करण्यात आला. यासाठी सुमारे पाच क्विंटल जळणाचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.
एस.एल. फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम
एस.एल. फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून तयार झालेला चिवडा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, वृद्धाश्रम, सामाजिक संस्था आणि सैन्यदलातील जवानांना पाठविण्यात येणार आहे. स्थानिक खाद्यसंस्कृतीला व्यापक ओळख मिळवून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
मोफत वितरित करण्यात आलेल्या बुढीच्या चिवड्याचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली. यवतमाळच्या खाद्यपरंपरेतील हा खास पदार्थ आता मोठ्या प्रमाणावर तयार करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
एकाच वेळी ३ हजार किलो बुढीचा चिवडा तयार करण्याचा हा उपक्रम विश्वविक्रम ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विश्वविक्रमाची अधिकृत नोंद झाल्याची पुष्टी अद्याप उपलब्ध नाही.
बाईट — विष्णू मनोहर, शेफ
सिटी न्यूज | दुर्गेश कान्हु | यवतमाळ



