यवतमाळच्या महागावात बसचालकाला लोखंडी रॉडने मारहाण!

साईड देण्यावरून वाद चिघळला; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, विद्यार्थिनींची तासभर गैरसोय
महागाव, यवतमाळ | दुर्गेश कान्हु
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव बसस्थानकाबाहेर साईड देण्यावरून झालेल्या वादातून मानव विकास बसच्या चालकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत बसचालक ज्ञानेश्वर वानखेडे किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव ते सेनद मार्गावर विद्यार्थिनींची वाहतूक करणारी मानव विकास बस क्रमांक एमएच ४० वाय ५४०६ महागाव बसस्थानकाबाहेर आली असताना, एमएच २८ एएन ३०२९ क्रमांकाच्या खासगी प्रवासी वाहनाच्या चालकासोबत साईड देण्यावरून वाद झाला. बसचालक ज्ञानेश्वर वानखेडे यांनी खासगी वाहन बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर हा वाद वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
या वादातून खासगी वाहनचालकाने लोखंडी रॉडने वानखेडे यांना मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारामुळे बसमधील विद्यार्थिनींमध्ये घबराट निर्माण झाली. तसेच महागाव ते सेनद मार्गावरील सुमारे २० विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी जवळपास तासभर प्रतीक्षा करावी लागली.
दरम्यान, महागावचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी बसचालकाची समजूत काढल्यानंतर ज्ञानेश्वर वानखेडे यांनी पुन्हा बस चालवली आणि विद्यार्थिनींना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविले. जखमी बसचालकाची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी बसचालकाने महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या घटनेच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.
सिटी न्यूज | दुर्गेश कान्हु | यवतमाळ



