अमरावतीच्या आई अंबाबाई मंदिरात भाविकांची मांदियाळी; नवरात्रोत्सवात भक्तीचा जागर!

पहाटेच्या अभिषेक आणि आरतीला भाविकांची विशेष उपस्थिती; दर्शनासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांसह भजन मंडळांची गर्दी
नवरात्रोत्सवानिमित्त अमरावती शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, शहराचे कुलदैवत असलेल्या आई अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पहाटे होणाऱ्या अभिषेक आणि आरतीच्या वेळी भाविकांची विशेष उपस्थिती पाहायला मिळत असून, संपूर्ण मंदिर परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात आई अंबाबाईच्या दर्शनासाठी विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, भजन मंडळांचे सदस्य, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या श्रद्धेने मंदिरात दाखल होत आहेत. देवीचे दर्शन घेऊन अनेक भाविक मनोभावे प्रार्थना करत आहेत. पहाटेच्या धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठीही भाविक उत्साहाने उपस्थित राहत आहेत.

नवरात्रोत्सवामुळे मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. आई अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.



