citynewsLatest NewsMaharashtraWashim

कामरगावातील वाढत्या चोऱ्यांवर शिवसेना शिंदे गट आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे पोलीस चौकीचा प्रश्न

स्वतंत्र पोलीस ठाणे आणि कर्मचारी वाढवण्याची मागणी; मंगेशभाऊ मुंदे-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कामरगाव, प्रतिनिधी सागर घोडे : कामरगाव आणि लगतच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी घरफोड्या, शेतातील कृषी पंपांच्या वायरची चोरी तसेच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाचे मंगेशभाऊ मुंदे-पाटील यांनी कामरगाव पोलीस चौकीच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

मुंदे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कामरगाव पोलीस चौकीचे स्वतंत्र पोलीस ठाण्यात रूपांतर करावे आणि चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या विधान परिषद आमदार भावनाताई गवळी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही याबाबत निवेदने देण्यात आल्याचे मुंदे-पाटील यांनी सांगितले. मात्र, स्थानिक पातळीवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोन ते तीन कर्मचाऱ्यांवर चौकीचा कारभार?

कामरगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील अनेक गावे या भागाशी जोडलेली आहेत. त्यामुळे 24 तास सुरक्षा, रात्रीची गस्त आणि वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस चौकीला अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मुंदे-पाटील यांच्या म्हणण्यानुसार, चौकीसाठी किमान 10 ते 12 पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना सध्या केवळ दोन ते तीन कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.

धनज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कामरगाव चौकीतील मनुष्यबळाचा प्रश्न कायम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन

कामरगाव पोलीस चौकीला आवश्यक पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्याचे मुंदे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, कामरगाव परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगेशभाऊ मुंदे-पाटील यांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button