citynewsLatest NewsMaharashtraWardha

हिंगणघाटमध्ये 660 लिटर मोहाचा सडवा जप्त; पोलिसांची धडक कारवाई

झऱ्या मंदिर परिसरातील झुडपांमध्ये छापा; पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार

हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कायद्यांतर्गत हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कॉटन मार्केटच्या मागे झऱ्या मंदिर परिसरातील झुडपांमध्ये छापा टाकून पोलिसांनी तब्बल 660 लिटर कच्चा मोहाचा सडवा जप्त केला. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 47 हजार 400 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुखबिराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलिसांनी कॉटन मार्केटच्या मागील झऱ्या मंदिर परिसरातील झुडपांमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाच प्लास्टिक ड्रममध्ये कच्चा मोहाचा सडवा आढळून आला.

पोलिसांनी पंचनामा करून पाचही ड्रममधील तब्बल 660 लिटर सडवा जप्त केला. कारवाईदरम्यान पोलिसांची चाहूल लागताच राजू खंगार, रा. मुजुमदार वॉर्ड, हिंगणघाट हा घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जप्त केलेला सडवा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला असून, त्याबाबत पंचनामा करण्यात आला. फरार आरोपी राजू खंगार याच्याविरोधात हिंगणघाट पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल राउत यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

कारवाईत प्रवीण बोधाने, स्वप्नील जिवने, अमोल गित्ते आणि सागर सामृतवार यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी हिंगणघाट पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अवैध दारू निर्मितीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरूच राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button