AmravaticitynewsLatest NewsMaharashtraSports

कुमकुमला वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण; अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा

जपानमध्ये रचला इतिहास; रिकर्व्ह आर्चरीच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्ण मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरल्याचा दावा, आता ऑलिम्पिकचे लक्ष्य

अमरावती : एकुलती एक मुलगी म्हणून लाडाकोडात वाढवण्याऐवजी तिच्यातील क्रीडा गुण ओळखून आई-वडिलांनी तिला धनुर्विद्येच्या मैदानावर पाठविले. घरच्या परिस्थितीची तमा न बाळगता कुमकुम मोहोड हिने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एक-एक पायरी गाठली. आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न तिने केवळ पाहिले नाही, तर ते आपल्या डायरीत आणि घरातील भिंतीवरही लिहून ठेवले. अखेर जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मध्ये कुमकुमने वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावत आपल्या स्वप्नाला वास्तवात उतरवले.

यापूर्वी कुमकुमने महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारातही सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे एशियन गेम्समध्ये तिच्या नावावर दोन सुवर्णपदके जमा झाली आहेत.

२०१८ मध्ये सुरू झाला धनुर्विद्येचा प्रवास

कुमकुमच्या क्रीडा प्रवासाची सुरुवात २०१८ मध्ये झाली. तिच्यातील क्रीडा गुण ओळखून आई-वडिलांनी तिला जिल्हा क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्याकडे धनुर्विद्येच्या सरावासाठी पाठविले.

प्रशिक्षकांनीही तिच्यातील प्रतिभा ओळखून सरावासाठी मेहनत घेतली. त्यानंतर कुमकुमने विविध स्पर्धांमध्ये सातत्याने कामगिरी करत यशाची एक-एक पायरी गाठली.

एशियन गेम्समध्ये भारताचा तिरंगा उंचावला गेला आणि कुमकुमच्या यशाची बातमी अमरावतीत पोहोचताच तिच्या कुटुंबीयांसह प्रशिक्षक आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विविध मान्यवर आणि राजकीय व्यक्तींनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तिच्या यशाचे कौतुक केले.

वडिलांनी दिलेले बळ

कुमकुमचे वडील अनिल मोहोड हे पेपर प्लेट्स तयार करण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी मुलीच्या क्रीडा स्वप्नाला सातत्याने पाठबळ दिले.

वैयक्तिक स्तरावर सुवर्णपदक मिळविण्याची कुमकुमची इच्छा तिच्या वडिलांना माहिती होती. यापूर्वी ती याबाबत बोलायची. त्यावेळी “देवाने तुला मोठ्या यशासाठी तयार केले आहे,” असा धीर ते तिला देत असत. आज त्या शब्दांना कुमकुमच्या सुवर्णपदकाच्या रूपाने अर्थ मिळाला आहे.

वडिलांचे स्वप्न लेकीने केले पूर्ण

कुमकुमच्या आई किशोरी मोहोड यांनीही आपल्या मुलीच्या यशाबद्दल भावना व्यक्त केल्या.

“तिने आयुष्यात काहीतरी वेगळे करावे, या विचारातून आम्ही तिला धनुर्विद्येकडे वळविले. शाळेत ती कदाचित कमी गेली असेल; मात्र धनुर्विद्येचे मैदान तिने कधीच सोडले नाही. तिच्या प्रत्येक निर्णयात आम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलो. आज तिने मिळवलेले सुवर्णपदक पाहताना तिच्या मेहनतीचा आणि आमच्या निर्णयाचा सार्थ अभिमान वाटतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

डायरीत आधीच लिहिले होते सुवर्णाचे स्वप्न

कुमकुमच्या मेहनतीसोबतच तिच्या ध्येयवेडाची झलक तिच्या डायरीतूनही दिसून येते. इतर देशात भारताचे ५२ सेकंदांचे राष्ट्रगीत वाजेल, असा उल्लेख तिने आधीच आपल्या डायरीत करून ठेवला होता.

तिने डायरीसोबतच घरातील भिंतींवरही आपली विविध क्रीडा उद्दिष्टे नोंदवून ठेवली होती. त्यामध्ये एशियन गेम्स २०२६, वर्ल्ड कपच्या विविध स्पर्धा, राष्ट्रीय वैयक्तिक पदके, एशिया कप, यूथ ऑलिम्पिक तसेच आंतरराष्ट्रीय आणि एशियन गेम्समधील पदकांचे लक्ष्य तिने लिहून ठेवले होते.

आज एशियन गेम्समधील सुवर्णपदकाच्या रूपाने तिच्या त्या स्वप्नातील आणखी एक ध्येय पूर्ण झाले आहे.

अमरावतीत विजयी रॅलीची तयारी

कुमकुम ५ ऑक्टोबर रोजी अमरावतीत परतणार असून तिच्या स्वागतासाठी क्रीडा विभागाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, क्रीडा उपसंचालक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासह विविध मान्यवर तिच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती विभागीय क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड यांनी दिली.

राजकमल चौक येथून कुमकुमच्या स्वागतासाठी विजयी रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

कुटुंबीय आणि चाहत्यांचा जल्लोष

वैयक्तिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर शनिवारी कुमकुमच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि चाहत्यांनी गुलाल उधळत, फटाके फोडत आणि राष्ट्रध्वज उंचावत जल्लोष केला.

कुमकुमच्या वडिलांनी सांगितले की, रिकर्व्ह आर्चरीमध्ये भारताला मिळालेले हे सुवर्णपदक अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासून कुमकुमच्या मनात असलेले वैयक्तिक सुवर्णपदकाचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. या यशामागे तिची प्रचंड मेहनत आणि सातत्य आहे.

आता लक्ष्य ऑलिम्पिकचे

एशियन गेम्समधील सुवर्णपदकानंतर कुमकुमसमोर आता पुढचे मोठे लक्ष्य २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव आणखी मोठे करण्यासाठी ती पुढील काळातही अशीच मेहनत घेईल, असा विश्वास तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केला.

अमरावतीच्या मातीतून सुरू झालेला कुमकुमचा धनुर्विद्येचा प्रवास आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत पोहोचला आहे. तिच्या या यशाने अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button