citynewsLatest NewsMaharashtraWashim

वाशिमच्या सोनल प्रकल्पात केवळ २३ टक्के पाणीसाठा; ३ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे सिंचन धोक्यात

४६ गावांवर पाणीटंचाईचे संकट; कालव्याने पाणी न सोडल्यास विहिरी-कूपनलिका कोरड्या पडण्याची भीती

वाशिम | प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यात यंदा दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असून, आता त्याचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित न राहता पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी होत असताना मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

सोनल प्रकल्प हा वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी एक असून, त्याचा उपयोग पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी केला जातो.

३ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांवर परिणाम

सोनल प्रकल्पातून परिसरातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजनांसोबतच रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी या प्रकल्पाच्या पाण्यावर शेतकऱ्यांची भिस्त आहे.

मात्र, यंदा प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा कमी असल्याने रब्बीच्या सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कालव्याचे पाणी न मिळाल्यास विहिरीही कोरड्या पडण्याची भीती

सोनल प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडल्यानंतर त्याचा काही भाग परिसरातील जमिनीत पाझरतो. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांतील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊन उन्हाळ्यापर्यंत पाणी उपलब्ध राहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मात्र यंदा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्याने कालव्याद्वारे पाणी सोडले गेले नाही, तर या विहिरी आणि कूपनलिकांना मिळणारा पाझर कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काही महिन्यांत पाणीटंचाईची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

४६ गावांसमोर मोठा प्रश्न

सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा आणि रब्बी पिकांना पाणी कुठून द्यायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेषतः पाणीसाठा आणखी कमी झाल्यास उन्हाळ्यापूर्वीच विहिरी आणि कूपनलिका आटण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सोनल प्रकल्पाचा उपयोग सिंचनासोबतच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी होत असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांसमोर रब्बीचे संकट

खरीप हंगामातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहेत. मात्र, सिंचनासाठी पाणी उपलब्ध न झाल्यास गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रशासनाने सोनल प्रकल्पातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा शेतकरी आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

बाईट : पांडुरंग कोठाळे, शेतकरी

सोनल प्रकल्पातील पाणीसाठ्याची ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात रब्बी पिकांचे सिंचन आणि ४६ गावांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button