भरधाव डंपरची ई-स्कूटरला भीषण धडक; B.Tech विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

गोधनी-झिंगाबाई टाकळी मार्गावर अपघात; मैत्रीण गंभीर जखमी, डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव डंपरने ई-स्कूटरला दिलेल्या भीषण धडकेत बी.टेकच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या अपघातात तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोधनी-झिंगाबाई टाकळी रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी ई-स्कूटरवरून दोन तरुणी जात होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर ट्रकने त्यांच्या ई-स्कूटरला धडक दिली.
या भीषण अपघातात झुलेलाल इन्स्टिट्यूटमध्ये बी.टेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारी मुस्कान देवाचंद खियालदासानी हिचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला.
तर तिच्यासोबत असलेली राजलक्ष्मी लोखंडे, जी ई-स्कूटर चालवत होती, या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर डंपर चालक दामोदर सीताराम सहारे हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ हालचाल करत पोलिसांना माहिती दिली.
मानकापूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आरोपी डंपर चालकाचा शोध घेतला आणि त्याला तात्काळ ताब्यात घेतले. तसेच अपघातग्रस्त डंपर पोलिसांनी जप्त केला आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताचा तपास सुरू केला आहे.
नेमका अपघात कशामुळे झाला, डंपरचा वेग किती होता आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, यासह अपघाताच्या इतर सर्व बाबींचा तपास मानकापूर पोलीस करत आहेत.
या भीषण अपघातात एका तरुण विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मानकापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



