citynewsLatest NewsMaharashtraWardha

पवनगाव परिसरातील हल्लेखोर वाघीण अखेर १८ दिवसांनी जेरबंद!

वाघिणीच्या दहशतीने भयभीत शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास; आमदार समीर कुणावार यांनी गाठले घटनास्थळ

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव आणि करूळ परिसरात गेल्या १८ दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. वाघिणीच्या सततच्या वावरामुळे आणि हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पवनगाव करूळ परिसरात या वाघिणीने अनेक जनावरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यासही घाबरत होते. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी विशाल मून यांच्यावर या वाघिणीने हल्ला केला होता. या हल्ल्यात विशाल मून गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर रोजी शेतपिकांच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोघांवरही वाघिणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

या सलग घटनांमुळे पवनगाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. वाघिणीला तातडीने जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार समीर कुणावार यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधून हल्लेखोर वाघिणीला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली होती.

यानंतर वनविभागाच्या पथकांकडून वाघिणीचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर तब्बल १८ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर २९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाला या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले.

वाघीण जेरबंद झाल्याची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी तातडीने पवनगाव गाठले. त्यांनी घटनास्थळी वनविभागाच्या पथकाची भेट घेतली आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पथकाचे अभिनंदन केले.

गेल्या १८ दिवसांपासून वाघिणीच्या दहशतीखाली असलेल्या पवनगाव आणि करूळ परिसरातील शेतकरी व नागरिकांनी वाघीण जेरबंद झाल्यानंतर अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मात्र, या घटनेनंतर वन्यजीव आणि मानवी वस्तीमधील संघर्ष टाळण्यासाठी पुढील काळात वनविभागाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत, शेतकऱ्यांची आणि नागरिकांची सुरक्षितता कायम राहावी, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता पुढे येत आहे.

पवनगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी १८ दिवसांची दहशत अखेर संपली… आणि हल्लेखोर वाघिणीच्या जेरबंदीनंतर परिसराने घेतला सुटकेचा निःश्वास!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button