कारंजा लाडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ११ बकऱ्या आणि ३ पिल्लांचा मृत्यू

मध्यरात्री बाड्यात बांधलेल्या बकऱ्यांवर कुत्र्यांचा हल्ला; पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान
कारंजा लाड : शहरातील बिलाल नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री बाड्यात बांधलेल्या बकऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने तब्बल ११ बकऱ्या आणि ३ लहान पिल्लांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे पशुपालक जुम्मा दाऊ रेघीवाले यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. बकऱ्यांचे पालनपोषण हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन होते. मात्र, एका रात्रीत त्यांच्या कळपातील अनेक बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबासमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.
दररोजप्रमाणे बकऱ्या बाड्यात बांधण्यात आल्या होत्या. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने बाड्यात घुसून बकऱ्यांवर अचानक हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळी पशुपालकाने बाड्यात पाहणी केली असता अनेक बकऱ्या आणि पिल्ले मृत अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त पशुपालकाला शासकीय मदत आणि योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, कारंजा लाड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
एका रात्रीत पशुपालकाचे मोठे नुकसान झाल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन आणि नगरपरिषद या घटनेची दखल घेऊन नुकसानग्रस्त पशुपालकाला मदत करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी सागर घोडे, सिटी न्यूज.



