कामरगाव वेल्डिंग स्फोटातील गंभीर रुग्णासाठी १०८ रुग्णवाहिका मिळेना? ३ तासांचा विलंब झाल्याचा आरोप

७० ते ८० टक्के भाजलेल्या ऑटोचालकाला अमरावतीला नेण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ; रुग्णालयाच्या आवारातील १०२ रुग्णवाहिकेबाबतही चौकशीची मागणी
वाशिम | कामरगाव
कामरगाव येथे गॅरेजमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना झालेल्या भीषण स्फोटात गंभीर भाजलेल्या ऑटोचालकाला उपचारासाठी अमरावतीला हलवताना रुग्णवाहिका सेवेत झालेल्या कथित विलंबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७० ते ८० टक्के भाजलेल्या रुग्णाला तब्बल तीन तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी कामरगाव येथील एका गॅरेजमध्ये डिझेलच्या टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत म्हसला येथील ऑटोचालक शेख अब्दुल शेख जलील हे गंभीररित्या भाजले.
स्फोटानंतर त्यांना तातडीने कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. डेंगळे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला रेफर करण्यात आले.
मात्र, कुटुंबीयांच्या आरोपानुसार, अमरावतीला जाण्यासाठी १०८ रुग्णवाहिका मागवण्यात आली असता लोकेशन मिळत नसल्याचे कारण सांगत तब्बल तीन तास रुग्णवाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागली.
याचदरम्यान, ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका MH-37-T-2257 उपलब्ध होती, असा कुटुंबीयांचा दावा आहे. ही रुग्णवाहिका सुस्थितीत असूनही रुग्णाला हलवण्यात आली नाही आणि तांत्रिक अडचणीचे कारण सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
७० ते ८० टक्के भाजलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर असताना रुग्णवाहिका सेवेत झालेल्या कथित विलंबामुळे कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. उपलब्ध रुग्णवाहिकेचा वापर का करण्यात आला नाही, त्या वाहनाची प्रत्यक्ष स्थिती काय होती आणि रुग्णाला वेळेत पुढील उपचारासाठी का हलवण्यात आले नाही, याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
अखेर रुग्णवाहिका मिळण्यात विलंब होत असल्याने नातेवाईकांनी नाईलाजाने खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि शेख अब्दुल यांना अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रेफर लेटर असूनही रुग्णाला दाखल करून घेण्याबाबत सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आल्याने नागपूरला जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या परिस्थितीत अत्यवस्थ असलेल्या शेख अब्दुल यांनी आपल्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याचे सांगत इथेच भरती करून घ्या, अशी विनंती केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अखेर नातेवाईकांनी आग्रह धरल्यानंतर शेख अब्दुल यांना इर्विन रुग्णालयातील बर्न युनिटमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कामरगाव ग्रामस्थांनी केली आहे. विशेषतः १०२ रुग्णवाहिका उपलब्ध असूनही तिचा वापर का करण्यात आला नाही, वाहन प्रत्यक्षात सुस्थितीत होते का, तांत्रिक अडचणी नेमकी काय होती आणि रुग्णवाहिका सेवा देण्यास विलंब का झाला, या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात जबाबदार व्यक्तींवर दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील रुग्णवाहिका उपलब्धता, कथित तांत्रिक बिघाड आणि उपचारासाठी झालेला विलंब याबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
एका बाजूला भीषण स्फोटात गंभीर भाजलेला रुग्ण आणि दुसऱ्या बाजूला उपचारासाठी रुग्णवाहिका मिळवताना कुटुंबीयांची झालेली धावपळ, यामुळे आपत्कालीन आरोग्यसेवेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का आणि शेख अब्दुल यांना पुढील उपचारासाठी आवश्यक मदत मिळते का, याकडे आता कामरगाव परिसराचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी सागर घोडे, सिटी न्यूज.



