Accident NewsLatest NewsMaharashtraYavatmal

घरासमोर खेळताना कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू!

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील हृदयद्रावक घटना; ऑक्सिजन ॲम्बुलन्स उपलब्ध न झाल्याचा उपसरपंचांचा आरोप

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असताना शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. अंश सुरज केळझरकर असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंश हा घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेला. मात्र कारमधून बाहेर पडता न आल्याने तो बराच वेळ कारमध्येच अडकून राहिला. काही वेळाने अंश दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.

शोध घेत असताना अंश बेशुद्ध अवस्थेत कारमध्ये आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र कारमध्ये बराच वेळ अडकून राहिल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला यवतमाळला हलविण्यात येत होते.

दरम्यान, घाटंजीहून यवतमाळला नेत असताना चिमुकल्यासाठी ऑक्सिजन ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नसल्याचा आरोप चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी केला आहे. मात्र, या आरोपाची संबंधित यंत्रणेकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही.

यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी नेत असतानाच अंशची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूने केळझरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेने चिखलवर्धा परिसरात शोककळा पसरली असून, खेळताना कारमध्ये गेलेल्या चिमुकल्यासोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button