धारणीतील सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई!

विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २५ वर्षीय आरोपीला अमरावती जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार
धारणी | प्रतिनिधी
धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. विविध शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असलेल्या २५ वर्षीय सराईत गुन्हेगाराला अमरावती जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अर्पित संजय मालवीय, वय २५ वर्षे, रा. ग्राम कवलझीरी, हनुमान मंदिराजवळ, होली चौक, धारणी याच्याविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात विविध शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील सामाजिक शांतता आणि सुरक्षिततेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर १५ सप्टेंबर २०२६ रोजी धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अर्पित संजय मालवीय याला अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतून पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक शांतता आणि सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध धारणी पोलीस ठाणे आणि अमरावती ग्रामीण पोलीस घटकाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नारायण धांडे, पोलीस हवालदार गणेश घुते आणि पोलीस हवालदार अनुराग कशीकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
धारणी परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधातील प्रतिबंधात्मक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



