BhandaracitynewsMaharashtra

अड्याळचे डंपिंग यार्ड उद्घाटनानंतरही बंद; बाजार परिसरात कचऱ्याचे ढीग

लाखो रुपये खर्चून उभारलेल्या प्रकल्पाचा वापरच नाही; दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे ग्रामस्थ त्रस्त

अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा : जनतेच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले अड्याळ येथील डंपिंग यार्ड उद्घाटनानंतरही प्रत्यक्ष वापरात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून उभारलेली इमारत वापराविना पडून असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे अड्याळ बाजार परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.

पवनी तालुक्यातील अड्याळ बाजार परिसरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कचरा व्यवस्थापनासाठी डंपिंग यार्ड उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, हे यार्ड अद्याप सुरू झाले नसल्याने त्याचा प्रत्यक्ष उपयोग होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

डंपिंग यार्डची इमारत उभी असताना बाजार परिसरात मात्र कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा वापर का केला जात नाही, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, महिलांसाठी बांधण्यात आलेले प्रसाधनगृहही अस्वच्छ अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या उपयोगाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डंपिंग यार्ड सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जाणार, तसेच बाजार परिसरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सरपंच आणि प्रशासन ठोस निर्णय कधी घेणार, याकडे आता अड्याळकरांचे लक्ष लागले आहे.

लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही नागरिकांना कचऱ्याच्या समस्येतून मुक्ती मिळत नसेल, तर डंपिंग यार्ड सुरू न होण्याचे कारण आणि झालेल्या खर्चाचा तपशील प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे. अड्याळच्या नागरिकांना आता केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कारवाईची अपेक्षा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button