रामटेकमध्ये पोलिसांचा रूट मार्च; मॉकड्रिलद्वारे सज्जतेचे प्रदर्शन

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन
रामटेक : आगामी पोळा, गणेशोत्सव, मस्कऱ्या गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर रामटेक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रामटेक पोलिसांच्या वतीने सोमवारी सायंकाळी रूट मार्च आणि मॉकड्रिल घेण्यात आली. पोलिसांच्या या शक्तिप्रदर्शनातून आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सर्व सण-उत्सव शांततेत आणि भयमुक्त वातावरणात साजरे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता रामटेक पोलीस ठाण्यापासून रूट मार्चला सुरुवात झाली.

हा मार्च शास्त्री चौक, माँ कालंका चौक आणि पापडुपेश्वर चौक मार्गे गांधी चौकात पोहोचला. गांधी चौकात पोलिसांकडून मॉकड्रिल आणि रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची तयारी पोलिसांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दाखवली. त्यानंतर नेहरू चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि बसस्थानक चौक परिसरातही मॉकड्रिल घेण्यात आली.

या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांच्यासह एसआरपीएफ, आरसीपी पथक तसेच १०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. आगामी सणांच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले.



