citynewsWashim

लेखी आश्वासनानंतर धनज बुजुर्गमधील आमरण उपोषणाची सांगता

आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचे ठोस आश्वासन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहसचिवांच्या मध्यस्थीला यश

कारंजा तालुक्यातील धनज बुजुर्ग येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव अमोल पाटणकर यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलनाला यश आले असून, आरोग्य सुविधा, रस्ते आणि घरकुल योजनेशी संबंधित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विशाल आघमे यांनी धनज बुजुर्ग येथे तहसील कार्यालयासमोर ७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते. धनज प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करणे, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

कारंजा ते धनज मुख्य रस्त्यासह गावातील शाळांकडे जाणारे तसेच अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली होती. याशिवाय रमाबाई आंबेडकर कॉलनीतील वाढीव गावठाण नियमित करून तेथील पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणीही करण्यात आली.

आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सभापती जयकिसन राठोड, निलेश सोमानी, सैय्यद अबरार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव अमोल पाटणकर यांनी मध्यस्थी करत रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आगामी दहा रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका धनजला देण्यात येईल, तसेच कायमस्वरूपी डॉक्टरांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले.

ग्रामसेवक शाम वेळूकर यांनी रस्त्यांच्या कामाबाबतही लेखी आश्वासन दिले. प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते विशाल आघमे यांच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.

प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली असली, तरी आता या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे धनज बुजुर्गमधील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आरोग्य केंद्रातील सुविधा, रुग्णवाहिका, डॉक्टरांची नियुक्ती आणि रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतरच आंदोलनाच्या मागण्यांना पूर्ण न्याय मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button