धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे बसस्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे सोन्याचे दागिने लंपास

गर्दीचा फायदा घेत दोन महिलांना लक्ष्य; सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह १ लाख ७७ हजार ६५० रुपयांचा ऐवज चोरीला
अमरावती : धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे येथील बसस्थानक परिसरात चोरीच्या दोन घटनांनी प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांना लक्ष्य करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ७७ हजार ६५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
पहिली घटना धामणगाव रेल्वे बसस्थानक परिसरात घडली. सुपलवाडा येथील दिपाली विनोद झाडे यांच्या जवळील ९ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि १० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपासून ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांदरम्यान ही चोरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरट्याने संधी साधत दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप आहे.
तर दुसरी घटना चांदूर रेल्वे बसस्थानकावर घडली. किरजवळा येथील ६६ वर्षीय शालु नरेशराव या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ९ ग्रॅम ४२० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. या मंगळसूत्राची किंमत अंदाजे २७ हजार ६५० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध BNS कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस ठाणे आणि चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याकडून या प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.

बसस्थानक परिसरातील गर्दीच्या वेळी चोरट्यांकडून प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याने प्रवाशांनी विशेषतः महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांना लक्ष्य केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता या दोन्ही चोरींचा छडा लावून आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.



