BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

चिखलीत निकृष्ट रेशनच्या तांदळावरून संतापाचा उद्रेक!

तहसीलदारांच्या केबिनबाहेरच लाभार्थ्यांनी फेकला तांदूळ; खाण्यायोग्य नसल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात रेशनच्या निकृष्ट तांदळावरून संतापाचा उद्रेक झाल्याची घटना समोर आली आहे. रेशन दुकानातून लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी थेट तहसील कार्यालय गाठले. यावेळी नागरिकांनी तहसीलदारांच्या केबिनबाहेरच रेशनचा तांदूळ फेकून देत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

चिखली शहरातील काही लाभार्थी कुटुंबांना रेशन दुकानातून मिळालेला तांदूळ खराब, चुरियुक्त आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा तांदूळ माणसांच्या खाण्यायोग्य नसल्याचे सांगत संतप्त नागरिकांनी हातात तांदळाचे नमुने घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले.

तहसीलदारांच्या केबिनबाहेर तांदूळ फेकला

तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर नागरिकांनी तहसीलदारांच्या केबिनसमोरच हा निकृष्ट तांदूळ ओतला. रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमच्या कोंबड्याही हा तांदूळ खात नाहीत, मग हा तांदूळ माणसांच्या ताटात का दिला जातोय? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

तहसीलदारांनी आधी खिचडी खावी, मग आम्ही खाऊ!

लाभार्थ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला थेट सवाल केला. या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी आपल्या कुटुंबासोबत खावी, त्यानंतर आम्हीही हा तांदूळ खाऊ, अशा शब्दांत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला.

रेशनच्या माध्यमातून गरीब आणि गरजू कुटुंबांना धान्य पुरवले जाते. मात्र जर हे धान्यच निकृष्ट दर्जाचे असेल, तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बुलढाणा जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रेशनच्या धान्याची गुणवत्ता, त्याची तपासणी आणि वितरण प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जे धान्य जनावरंही खात नाहीत, ते माणसांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का, असा सवाल संतप्त लाभार्थ्यांनी प्रशासनाला केला आहे.

तांदळाची तपासणी होणार का?

चिखलीतील या घटनेनंतर रेशनच्या तांदळाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातात का, त्याचा दर्जा नेमका काय आहे आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लाभार्थ्यांना दर्जेदार आणि खाण्यायोग्य धान्य मिळावे, तसेच निकृष्ट धान्य वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सिटी न्यूजसाठी गजानन राऊत, चिखली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button