citynewsLatest NewsMaharashtraNanded

चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

नांदेडच्या लोहा तालुक्यातील संतापजनक घटना; आरोपी फरार, सोनखेड पोलिसांकडून कसून शोध सुरू

नांदेड : नांदेडच्या लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व्यक्तीने चिमुकलीला सोबत नेले आणि तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून सोनखेड पोलिसांनी पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पीडित तीन वर्षीय चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व्यक्तीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले.

सुमारे २० ते २५ मिनिटांनंतर संबंधित व्यक्ती मुलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. त्यानंतर मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने विचारपूस केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे मुलीने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

आरोपी फरार; पोलिसांकडून शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button