रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण यापुढेही सुरू राहणार

रोजगार हिरावून घेणारे नव्हे, रोजगार देणारे शासन; अफवांवर विश्वास ठेवू नका – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेले मराठी भाषा प्रशिक्षण यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या १०५ दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ८०० रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमाला चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मराठी शिकण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी
ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना अद्याप मराठी भाषेचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. सुरुवातीला एक महिन्याची मुदत देण्यात येईल. त्यानंतर आवश्यक असल्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार असून, या एकूण चार महिन्यांच्या कालावधीत चालकांना मराठी भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे.
या कालावधीत संबंधित चालकांवर बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाणार नाही. मात्र, संबंधित कायद्यानुसार बॅज निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते. चार महिन्यांच्या कालावधीनंतरही जाणीवपूर्वक मराठी भाषा शिकण्यास नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
प्रशिक्षणासाठी कार्यशाळा सुरू राहणार
मराठी शिकण्यास इच्छुक असलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत.
मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई या भागांतील प्रशिक्षण केंद्रांची यादी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रांची माहिती मिळवण्यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्वतंत्र संपर्क क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
मराठी भाषा अभियानही पुढे सुरू राहणार
परिवहन विभागाने हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेच्या भावनेतून राबविला असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. तसेच मराठी भाषा विभागांतर्गत राबविण्यात येणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान सातत्याने पुढे सुरू ठेवण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकविण्यासाठी कार्यशाळा घेण्यास कामगार नेते शशांक राव यांनीही सहमती दर्शविली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
परिवहन विभागाच्या निर्देशांचे उल्लंघन करून किंवा कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कोणी काम करत असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणे ही विभागाची जबाबदारी असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मात्र, शासन कोणाचाही रोजगार हिरावून घेण्याच्या भूमिकेत नसून रोजगार देणारे शासन म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा दावा करत मंत्री सरनाईक यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांशी शासन सातत्याने संवाद साधत आहे. त्यांच्या सूचनांचा विचार करून कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाणार नाही, अशी शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ करावा, या उद्देशाने हा उपक्रम पुढेही सुरू राहणार आहे.



