अरोलीत नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांची मोठी कारवाई

२१ मांजा चक्री जप्त; विक्रेता पोलिसांच्या ताब्यात, नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले
अरोली परिसरात नायलॉन मांज्याच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नायलॉन मांज्याची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या एका विक्रेत्याला पोलिसांनी जेरबंद करत तब्बल २१ मांजा चक्री जप्त केल्या आहेत. अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
रामटेक डिव्हिजनमधील अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांज्याची अवैध विक्री करणाऱ्या हेमंत बबन बावनकुळे याच्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
अरोली परिसरात नायलॉन मांज्याची अवैध विक्री आणि साठवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आणि हेमंत बावनकुळे याला जेरबंद केले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल २१ मांजा चक्री जप्त केल्या आहेत. अरोली परिसरातील नायलॉन मांज्याविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
नायलॉन मांज्यामुळे पक्ष्यांसोबतच दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नायलॉन मांज्याच्या वापर आणि विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे.
ठाणेदार सागर गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश भुरे यांनी तत्परतेने ही कारवाई केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अरोली परिसरातील नायलॉन मांजा विक्रेते आणि वापरकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही नायलॉन मांज्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सिटी न्यूजसाठी रामटेकमधून अजय मेहरकुळे.
अरोलीत झालेल्या या कारवाईत २१ मांजा चक्री जप्त करत पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्याला जेरबंद केले आहे. नागरिक आणि पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी नायलॉन मांज्याविरोधातील कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



