
गौरक्षण परिसरात सूरज मिश्रा आणि समस्त मित्र मंडळाचा पुढाकार; आई जगदंबेच्या स्तुतीसाठी नागरिकांची मोठी गर्दी
नवरात्रोत्सवानिमित्त अमरावती शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील गौरक्षण परिसरात सूरज मिश्रा आणि समस्त मित्र मंडळाच्या नेतृत्वात ‘सीझन थ्री’ मोफत गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, इतर काही ठिकाणी गरब्यासाठी शुल्क आकारले जात असताना या महोत्सवात नागरिकांना विनाशुल्क सहभागी होता येत आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौरक्षण परिसरातील मोफत गरबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आई जगदंबा भवानीच्या स्तुतीसाठी पारंपरिक गरब्याच्या तालावर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साह यांचा संगम या महोत्सवाच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे.

गरब्यासाठी शुल्क आकारले जाणाऱ्या काही आयोजनांच्या तुलनेत हा महोत्सव विनाशुल्क खुला ठेवण्यात आल्याने नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळत आहे. आयोजक सूरज मिश्रा यांच्या माहितीनुसार, माजी खासदार नवनीत राणा, बडनेराचे आमदार रवी राणा तसेच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या महोत्सवाला भेट दिली आहे. नवरात्रीच्या उत्साहात रंगलेल्या या मोफत गरबा महोत्सवामुळे गौरक्षण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.



