“आम्ही शेतकरी काय भिकारी आहोत का?”; ५ हजारांच्या मदतीवर रविकांत तुपकरांचा संताप

हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी; मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा
दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत देण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही शेतकरी काय भिकारी आहोत का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी जाहीर केलेली मदत अपुरी असल्याचे म्हटले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

राज्य सरकारने दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी लक्षात घेता ही मदत पुरेशी नसल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली. तुटपुंज्या मदतीऐवजी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत ५ हजार रुपयांची मदत कितपत पुरेशी ठरणार, असा प्रश्न उपस्थित करत तुपकर यांनी हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. सरकारने ही मागणी मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीच्या घोषणेवरून शेतकरी नेते आणि सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.



