मासुलकसा जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक; चिमुकल्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण

स्लॅबचे पोपडे निघाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; दुरुस्ती किंवा पर्यायी वर्गखोलीची पालक-ग्रामस्थांची मागणी
गोंदिया | प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मासुलकसा येथून शिक्षण व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेतील दोन वर्गखोल्यांच्या स्लॅबचे पोपडे निघत असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
स्लॅबचे पोपडे निघाल्याने धोका
मासुलकसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीतील दोन वर्गखोल्यांची अवस्था चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. स्लॅबचा काही भाग खराब झाल्याने तो कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना वर्गखोल्यांमध्ये न बसवता बाहेर बसवून शिक्षण दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पालकांकडून प्रशासनावर प्रश्न
शाळेच्या इमारतीची दुरवस्था लक्षात घेता पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे यापूर्वीही दुरुस्तीची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आल्याचा दावा आहे.
मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सुरक्षित वर्गखोलीची मागणी
एकीकडे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे त्यांना सुरक्षित वर्गखोलीही उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती मासुलकसा येथे पाहायला मिळत आहे.
धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने शाळेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी किंवा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी सुरक्षित वर्गखोलीची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दुर्घटनेपूर्वी प्रशासन जागे होणार का?
दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि पंचनामा करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
मासुलकसा शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गखोली कधी मिळणार आणि प्रशासन यावर तातडीने कोणती कार्यवाही करणार, याकडे आता पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
साहिल रामटेके | सिटी न्यूज, गोंदिया



