AkolacitynewsLatest NewsMaharashtra

वाईन बारच्या एनओसीसाठी लाच मागितल्याचा आरोप; पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

६५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार; तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारताना चान्नी पोलीस ठाण्यात रंगेहात कारवाई

अकोला | प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यात लाचखोरीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. वाईन बार सुरू करण्यासाठी आवश्यक एनओसी देण्याच्या बदल्यात ६५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला. या कारवाईत चान्नी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महादेव मधुकरराव देशमुख यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

एनओसीसाठी लाच मागितल्याची तक्रार

तक्रारदारांचा पांगरा रोड, मळसूर येथे बिअर आणि वाईन शॉपीचा व्यवसाय आहे. वाईन बार सुरू करण्यासाठी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला होता. या प्रक्रियेसाठी संबंधित पोलीस ठाण्याकडून एनओसी आवश्यक होती.

हीच एनओसी देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांनी ६५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

तडजोडीनंतर ३५ हजार रुपये ठरले

तक्रारीची एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे तपासात समोर आले. यातील ३० हजार रुपये ठाणेदारांसाठी आणि ५ हजार रुपये स्वतःसाठी असल्याचे सांगितल्याचे एसीबीच्या माहितीत नमूद आहे.

पोलीस ठाण्यातच एसीबीचा सापळा

१८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चान्नी पोलीस ठाण्यातील खुफिया कक्षात लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना रंगेहात पकडले.

दरम्यान, ठाणेदार श्री. दराडे यांच्याविरोधातील पैशाच्या मागणीची पडताळणी नकारात्मक आल्याचे एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

घरझडती सुरू; पुढील तपासाला वेग

या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या घराची झडती घेण्याची कारवाईही सुरू आहे.

वाईन बारच्या एनओसीसाठी लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील तपास एसीबीकडून सुरू असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button