नागपुरात अस्थिका समाजाचा १९ वा दीपोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री भगवती सभागृहात तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; विदर्भातून हजारो भाविकांची उपस्थिती
नागपूर | प्रतिनिधी
नागपूरच्या त्रिमूर्ती नगरातील अस्थिका समाजाचा १९ वा दीपोत्सव सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्री भगवती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याला विदर्भातील विविध भागांतून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. गणपती पूजन, घटस्थापना, वेदपारायण, दीपपूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
गणपती पूजनाने सोहळ्याला सुरुवात
तीन दिवसीय दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ गणपती पूजन आणि घटस्थापनेने करण्यात आला. चेन्नई येथील युवा प्रवचनकार कु. आध्या वेंकटेश यांच्या संकीर्तन प्रवचनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
आदिपुरम दिनानिमित्त गणपती पूजनासोबत कन्या पूजन आणि कुमारी पूजनाचेही आयोजन करण्यात आले. यानंतर वैदिक संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांनी गुरुजी श्री. प्रवीण लिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदपारायण सादर केले.
सुहासिनींच्या दीपपूजेने वाढली सोहळ्याची शोभा
दीपोत्सवातील सुहासिनींच्या भव्य दीपपूजेने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली. समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने या धार्मिक विधीत सहभाग घेतला. तसेच श्रीनगर येथील अहिगिरी नंदिनी महिला समूहाने महिषासुर मर्दिनी गीतावर आधारित आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
तीनही दिवस देवी भवानी आणि देवी अंडाळ यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दीपपूजेसाठी नोंदणी केलेल्या सुहासिनींसाठी अस्थिका समाजाच्या व्यवस्थापन समितीने विशेष व्यवस्था केली होती.
मान्यवरांचा सत्कार
कार्यक्रमाला राजू तलमले यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी विशेष अतिथी देवरावजी प्रधान आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा प्रधान यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मंगला आरतीने सोहळ्याची सांगता
तीन दिवसांचा हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या व्यवस्थापन समितीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. अखेर देवी अंडाळ आणि देवी भवानी यांच्या मंगला आरतीने तीन दिवसीय दीपोत्सव सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
यावेळी अस्थिका समाजाचे सचिव के. व्ही. नागराजन यांनी उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानले. धार्मिक विधी, वेदपारायण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अस्थिका समाजाच्या १९ व्या दीपोत्सव सोहळ्यात भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.



