मालटेकडी अपघात प्रकरणात महिलेची बाजू समोर; सीसीटीव्ही तपासण्याची मागणी

डॉक्टरच्या कारने धडक दिल्याचा महिलेचा दावा; सोशल मीडियावर बदनामी होत असल्याचा आरोप
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील मालटेकडी परिसरात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातानंतर आता संबंधित महिलेने ‘सिटी न्यूज’समोर आपली बाजू मांडली आहे. डॉक्टरच्या कारने आपल्याला धडक दिल्याचा दावा करत, या घटनेनंतर आपल्यालाच दोषी ठरवण्यात आल्याचा आरोप मंगला पंकज वासनिक यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘कारने मला धडक दिली’
मंगला वासनिक यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित डॉक्टरची कार चुकीच्या बाजूला उभी होती आणि त्याच कारने आपल्याला धडक दिली. या घटनेपूर्वीच आपल्या पायाला फ्रॅक्चर तसेच डोक्याला दुखापत झाली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.
धडकेनंतर कारने आपल्याला धडक दिल्याचे संबंधित व्यक्तीने मान्य केले नसल्याने वाद निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘मलाच जबाबदार ठरवले’
अपघातानंतर आपले काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आणि आपल्यालाच या घटनेसाठी जबाबदार ठरवण्यात आल्याचा आरोप मंगला वासनिक यांनी केला आहे.
आपली आर्थिक परिस्थिती बिकट असून, आपण स्वतःचा आणि आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करत असल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातात आपल्या वाहनाचे नुकसान झाले असून, वाहनाचा विमा असतानाही ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रश्नामुळे वाहनाची दुरुस्ती करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘सीसीटीव्हीतून सत्य समोर येऊ द्या’
या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी मालटेकडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी मंगला वासनिक यांनी केली आहे.
तसेच सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरून आपली बदनामी करू नये आणि आपल्याला चुकीच्या नजरेने पाहून त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
मंगला वासनिक यांनी या प्रकरणात आपली कोणतीही चूक नसल्याचा दावा करत संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी ‘सिटी न्यूज’च्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे दावे तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित असून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष परिस्थिती आणि संबंधित यंत्रणेच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.



