अमरावतीत Yonex-Sunrise राज्यस्तरीय सब-ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

‘उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी’ – आ. सौ. सुलभाताई खोडके; राज्यभरातील ४९८ खेळाडूंचा सहभाग
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती येथे आयोजित Yonex-Sunrise G. H. Raisoni Memorial 2nd Maharashtra State Sub-Junior (U-9, U-11 आणि U-13) Selection Badminton Tournament 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेला गुरुवारी जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या वेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
अमरावती सिटी अँड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन आणि जी.एच. रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अँड कल्चरल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाला विभागीय आयुक्त नयना गुंडे, विभागीय क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, जी.एच. रायसोनी फाउंडेशनचे संचालक पी. आर. अमित गंधारे, अमरावती सिटी अँड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धामोरीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की, क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. खेळाडूंच्या यशामध्ये समाजाचाही महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे नवोदित खेळाडूंना संधी आणि प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, अमरावती शहरातील क्रीडा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि विभागीय तसेच जिल्हा क्रीडा संकुलाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, सराव आणि स्पर्धांच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असून, त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास दिला.
यंदाच्या स्पर्धेसाठी राज्यभरातून ७०३ खेळाडूंनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४९८ खेळाडू प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी झाले आहेत. अंडर-९, अंडर-११ आणि अंडर-१३ वयोगटांत मुला-मुलींच्या एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध गटांतील सामने खेळविले जात आहेत.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अंडर-१३ गटातील सुमारे २०० सामने पार पडले. अकोला, नांदेड, पुणे, मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामने ९ ऑगस्ट रोजी होणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
या उद्घाटन समारंभाला खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील युवा बॅडमिंटनपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



