भाड्याने घेतलेल्या 345 सेंट्रिंग प्लेट्सची परस्पर विक्री; नाव बदलून फरार आरोपीला यशोधरा नगर पोलिसांची अटक

कुही आणि वाठोडा परिसरातून संपूर्ण मुद्देमाल जप्त; तांत्रिक तपासातून फसवणुकीचा उलगडा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याने घेतलेल्या सेंट्रिंग प्लेट्सची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अनेक दिवस नाव बदलून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली असून त्याने विकलेल्या 345 सेंट्रिंग प्लेट्स जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. लक्ष्मी रमेश बुरुडे या सेंट्रिंग प्लेट्स भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. आरोपी शकीब आरिफ अगवानी याने त्यांच्या कडून 345 सेंट्रिंग प्लेट्स भाड्याने घेतल्या होत्या. मात्र, वापरानंतर त्या परत न करता आरोपीने त्यांची परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी फरार असल्याचे समोर आले. तसेच तो नाव बदलून विविध ठिकाणी वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर यशोधरा नगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीने सेंट्रिंग प्लेट्स विकल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कुही आणि वाठोडा परिसरात कारवाई करत सर्व 345 सेंट्रिंग प्लेट्स जप्त केल्या.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तेलरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लक्ष्मण पलवर आणि राहुल बोंद्रे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सध्या आरोपीला एमसीआरवर ठेवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
भाड्याने घेतलेला माल परस्पर विकून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्क आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याचा तपास पोलीस करत आहेत.



