AmravatiamravaticitynewsLatest NewsMaharashtra

पवन सुरजुसे यांच्या बदलीवरून अमरावतीत विद्यार्थ्यांचे आंदोलन; व्यवस्थापन-पालक आमनेसामने

‘बदली रद्द करा’च्या घोषणांनी शाळा परिसर दणाणला; व्यवस्थापनाचा विद्यार्थ्यांच्या वापराचा आरोप, पालकांचा विरोध

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीतील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात शिक्षक पवन सुरजुसे यांच्या बदलीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या बदलीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालकांनी आंदोलन छेडले असून, शाळा परिसरात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात शाळा व्यवस्थापन आणि पालकांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत.

मंगळवारी शेकडो विद्यार्थी हातात “पवन सरांची बदली रद्द करा” अशा आशयाचे फलक घेऊन शाळा परिसरात एकत्र आले. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत शिक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी केली.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, पवन सुरजुसे हे नियमित अध्यापनासोबतच अतिरिक्त वर्ग घेऊन इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठीसह विविध विषयांचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या अध्यापनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाली असून, शैक्षणिक वर्ष सुरू असताना त्यांची बदली झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असा दावा विद्यार्थ्यांनी केला.

या संदर्भात City News ने शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी असहमती दर्शवली. व्यवस्थापनाचा आरोप आहे की संबंधित शिक्षक स्वतःची बदली रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करत आहेत.

मात्र, पालकांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, पवन सुरजुसे हे समर्पित आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक असून, त्यांच्या अध्यापनाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सामूहिक निवेदनाद्वारे व्यवस्थापनाकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे आंदोलन १ ऑगस्टपासून सुरू असून, व्यवस्थापनाकडून दोन ते तीन वेळा आश्वासने देण्यात आली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी वाढली आहे.

दरम्यान, या आंदोलनाची शहरभर चर्चा सुरू असून, शाळा व्यवस्थापन या प्रकरणावर पुढे काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टीप: या वृत्तातील विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचे दावे संबंधित पक्षांनी मांडलेल्या भूमिकांवर आधारित आहेत. या प्रकरणी अंतिम निर्णय संबंधित प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाकडून होणे अपेक्षित आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button