सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरव्यवहारावर राज्य अभियंता संघटना आक्रमक; चौकशी व कारवाईची मागणी

२२१६ आणि २०५९ लेखाशीर्षांतील कामांमध्ये आर्थिक अनियमिततेचा आरोप; दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित बेनामी कामे आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राज्य अभियंता संघटना आक्रमक झाली आहे. २२१६ आणि २०५९ या लेखाशीर्षांअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत संघटनेने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले असून, प्रत्यक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, २२१६ आणि २०५९ या लेखाशीर्षांअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनेक कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. दहा लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची अनेक कामे मजूर सहकारी संस्थांच्या नावावर मंजूर करून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे.
याशिवाय, गरज नसताना सुस्थितीतील भिंती पाडून नव्याने बांधकाम करणे, तसेच चांगल्या स्थितीतील पेव्हिंग ब्लॉक काढून नवीन ब्लॉक बसवण्यासारखी कामे करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
काही प्रकरणांमध्ये संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी कार्यारंभ आदेश दिले नसल्याचे तसेच अंदाजपत्रक तयार केले नसल्याचे स्पष्ट केल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.
संघटनेने प्रलंबित देयकांची प्रत्यक्ष पाहणी करूनच मंजुरी द्यावी, कथित अनधिकृत कामे तात्काळ थांबवावीत तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्य अभियंता संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणातील आरोपांची चौकशी आणि त्यानंतरची कारवाई याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



