महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता बिहारमधून अटकेत

भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी एका संशयितालाही ताब्यात, आरोपीला पुणे विमानतळावरून भिवंडीकडे रवाना
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याला बिहारमधून अटक केली आहे. त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई भिवंडी पोलिसांनी केली. अटक करण्यात आलेल्या बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून ताब्यात घेऊन पुणे विमानतळावर आणण्यात आले असून तेथून पुढील चौकशीसाठी त्याला भिवंडीकडे नेण्यात येत आहे.
मात्र, बिजेंद्र गुप्ताला बिहारमधील नेमक्या कोणत्या जिल्ह्यातून अटक करण्यात आली, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात यापूर्वीही अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून तपास यंत्रणा पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सखोल चौकशी करत आहे.
बिजेंद्र गुप्ताच्या अटकेनंतर या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू होणार असून तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



