वर्ध्यातील १२ वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत

शेजारील शेतात काम करणारा मजूर निघाला आरोपी; सखोल तपासासाठी एसआयटीची स्थापना
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान शेजारील शेतात काम करणारा शेतमजूर राहुल राजू मडावी (वय ३०) यानेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी रोठा गावात १२ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत विविध तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे राहुल राजू मडावी हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपी हा पीडित मुलीच्या घराजवळील शेतात मजुरीचे काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या पथकामार्फत फॉरेन्सिक अहवाल, तांत्रिक पुरावे आणि इतर वैज्ञानिक तपासाच्या आधारे प्रकरणाचा सर्वंकष तपास केला जाणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील प्राथमिक निष्कर्षांची माहिती दिली.
दरम्यान, या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात हळहळ आणि संतापाचे वातावरण कायम असून, आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला असून, न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



