वर्ध्यात १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; हत्येचा गुन्हा दाखल, तपास वेगात

रोठा शिवारातील घटनेने जिल्हा हादरला; पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील रोठा शिवारात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासानंतर या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलगी जिल्हा परिषद शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलण्यासाठी गेली होती. काही वेळानंतर तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण करण्यात येत आहे. तपासाच्या दृष्टीने परिसराची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्यासह सावंगी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू असून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे.
या प्रकरणामागील नेमके कारण, आरोपीची ओळख आणि घटनेची पार्श्वभूमी याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



