डोंगरगाव वीज उपकेंद्राला शेतकरी व नागरिकांचा घेराव

अनियमित वीजपुरवठ्याविरोधात संताप; महावितरणविरोधात जोरदार आंदोलन, आमदार अविनाश ब्राह्मणकरांची भेट
भंडारा | प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील डोंगरगाव येथे कृषी पंपांना होणारा अनियमित वीजपुरवठा आणि वारंवार खंडित होणाऱ्या घरगुती वीजपुरवठ्याविरोधात शेतकरी व नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरा डोंगरगाव वीज उपकेंद्राला घेराव घालत महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार आंदोलन केले.
यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक शेतकरी भात रोवणीसाठी कृषी पंपांवर अवलंबून आहेत. मात्र वेळेवर आणि नियमित वीजपुरवठा होत नसल्याने शेतीची कामे विस्कळीत होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.
याशिवाय, घरगुती वीजपुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनाची माहिती मिळताच आमदार अविनाश भाऊ ब्राह्मणकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.
परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात केला.
दरम्यान, वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात आला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी आणि नागरिकांनी दिला आहे.
डोंगरगाव परिसरातील वाढत्या वीज समस्येमुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आता महावितरण प्रशासन या समस्येवर किती लवकर आणि प्रभावी उपाययोजना करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



