agriculturecitynewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेडमध्ये पावसाने घेतली विश्रांती; खरीप हंगाम संकटात, शेतकऱ्यांची वाढली चिंता

आठ-दहा दिवसांपासून पावसाचा खंड; पिके वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार, दुबार पेरणीचे संकट

नांदेड | प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या पावसावर मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्यानंतर आता पावसाअभावी कोवळी पिके करपू लागली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पिके वाचवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत.

यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली. सोयाबीन, कापूस, हळद आणि इतर पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सलग आठ ते दहा दिवस पाऊस न झाल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाअभावी अनेक ठिकाणी उगवलेली कोवळी पिके सुकू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी किंवा अन्य जलस्रोत उपलब्ध आहेत, ते तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देऊन त्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः सोयाबीन पिकासाठी तुषार सिंचनाचा वापर वाढल्याचे चित्र दिसत आहे.

मात्र, सिंचनासाठी लागणारा वाढीव खर्च, वीज, इंधन तसेच आधीच वाढलेले बियाणे आणि खतांचे दर यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण अधिकच वाढला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर अनेक भागांतील पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता असून दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे उत्पादन खर्चात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कृषी क्षेत्राचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले असून, वेळेत पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळू शकतो. अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button