मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले माफ करण्याचा निर्णय

‘शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे’ म्हणत थकीत वीजबिल माफीची घोषणा; ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी वीजजोडण्यांना दिलासा
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता ४८ हजार कोटी रुपयांची जुनी कृषी वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नावावर ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी वीजजोडण्यांची मोठ्या प्रमाणात थकीत वीजबिले आहेत. या थकबाकीमुळे महावितरणचे कर्मचारी वसुलीसाठी येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये कायम होती.
याच पार्श्वभूमीवर सरकारने ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने इतिहास लिहिता आला पाहिजे. याच उद्देशाने आम्ही हा निर्णय घेत आहोत.”
या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घोषणेची अंमलबजावणी, पात्र लाभार्थी, अटी व शर्ती तसेच शासन निर्णय (GR) याबाबतची अधिकृत माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्ध झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.



