BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

पीएम श्री शाळेची इमारत परवानगीविना पाडल्याचा आरोप; चौकशीची मागणी

साकोलीतील जिल्हा परिषद शाळेचे प्रकरण; शाळा प्रशासनाची तक्रार, शासकीय साहित्य नेल्याचाही आरोप

भंडारा | प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील सेंदूरवाफा परिसरात असलेल्या जिल्हा परिषद पीएम श्री क्रमांक १ शाळेची इमारत कोणतीही अधिकृत परवानगी किंवा शाळा प्रशासनाला पूर्वसूचना न देता पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शाळा प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्हा परिषद पीएम श्री क्रमांक १ शाळेची इमारत क्रमांक २८७ बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आली. तसेच एमएच ३६ एए १३२६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे इमारतीतील साहित्यही नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या शाळेत सुमारे ३२० विद्यार्थी शिक्षण घेत असून संबंधित इमारत जीर्ण झाल्यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, त्या प्रस्तावावर निर्णय होण्यापूर्वीच इमारत पाडण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या पाडकामाशी नगरपरिषदेचा कोणताही संबंध नसल्याचे संबंधित प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे पाडकाम नेमके कुणाच्या आदेशाने करण्यात आले, बुलडोझरचा वापर कोणी केला आणि शासकीय साहित्य कुठे नेण्यात आले, याबाबत सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, अधिकृत चौकशी अहवालानंतरच या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button