सक्करदरा परिसरात गांजासह आरोपी अटकेत

गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई; ४४४ ग्रॅम गांजा जप्त, अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांचा पुन्हा घाला
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील सक्करदरा परिसरात अंमली पदार्थांविरोधात सक्करदरा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला गांजासह अटक केली आहे. नियमित गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडून ४४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ८ हजार ८८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राइम पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सक्करदरा पोलीस ठाण्याचे पथक नियमित गस्त घालत असताना सक्करदरा लेक गार्डनच्या भिंतीलगत फुटपाथवर एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव विजय देवानंद ताजने असल्याचे सांगितले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये ७३ प्लास्टिक पाउच आढळून आले. या पाउचमध्ये एकूण ४४४ ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तत्काळ गांजा जप्त करून आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला अंमली पदार्थ कुठून आणण्यात आला होता आणि त्याची विक्री कुठे केली जाणार होती, याचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही आणखी एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. सक्करदरा पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीत सहभागी असलेल्या व्यक्तींना कठोर इशारा मिळाला असून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



